संभाजीनगर-जळगाव मार्गावर चौका घाटात २ तास वाहतूक ठप्प
फुलंब्री, (प्रतिनिधी) _: छत्रपती संभाजीनगर - जळगाव मार्गावरील चौका घाटात शुक्रवारी सकाळी ९.३० वाजता ऊसाने भरलेल्या ट्रॅक्टरची ट्रॉली एका कारवर उलटली. सुदैवाने अपघातात कुणीही जखमी झाले नाही मोठी जीवितहानीची तळली . या अपघातामुळे चौका घाटातील वाहतूक २ तास ठप्प झाली होती. अखेर क्रेनद्वारे उलटलेली ट्रॉली बाजूला केल्यानंतर ११.३० वाजता वाहतूक सुरळीत झाली. ट्रॅक्टरला दोन ट्रॉली जोडून क्षमतेपेक्षा क्षमतेपेक्षा जास्त उसाची वाहतूक केली जात होती. त्यामुळे हा अपघात झाला.
वाळूजमधील रहिवासी उमराव पाटील हे कुटुंबासह अजिंठा लेणी पाहण्यासाठी कारने (एमएच ५७-३९९९) निघाले होते. कारमध्ये त्यांचे आई-वडील, पत्नी आणि मुले होते. तर वरझडी (ता. अंबड, जि. जालना) येथून विना क्रमांकाचा ट्रॅक्टर खुलताबाद येथील घृष्णेश्वर साखर कारखान्यात ऊस घेऊन जात होता. ट्रॅक्टरला दोन ट्रॉल्या जोडलेल्या होत्या. चौका घाटातील चढ असल्याने ट्रॅक्टरला लोड झेपला नाही. त्यामुळे ट्रॅक्टर मागे सरकला आणि ट्रॉली मागे असलेल्या कारवर उलटली. सुदैवाने अपघात झाला त्यावेळी घाटात वाहनांची वर्दळ कमी होती.
त्यामुळे मोठा अनर्थ टळला. घटनेनंतर फुलंब्री पोलिसांनी जेसीबीच्या साहाय्याने ट्रॉलीतील ऊस बाजूला केला. तसेच कलंडलेली ट्रॉली पुन्हा उभी केली. सुदैवाने कारमधील कुणालाही इजा झाली नाही. मात्र, ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. रस्त्यावर ट्रॉली कलंडल्यामुळे अनेक वाहने ऊस चिरडत पुढे निघून गेली.अपघातानंतर ट्रॅक्टरचालक घटनास्थळावरून फरार झाला. या प्रकरणी कारचालक उमराव अभिमान पाटील (रा. वाळूज, ता. गंगापूर) यांनी दिलेल्या तक्रारीवरून फुलंब्री ठाण्यात ट्रॅक्टरचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोनि. सहाणे यांच्या मार्गदर्शनात जमादार शेख मुजीब करीत आहेत.















